बंदुकीच्या धाकाने ‘शेफ’ला लुटणारे गजाआड; कोंढव्यातील धक्कादायक घटना

पुणे : कोंढव्यात बंदुकीचा धाक दाखवून एका उपाहारगृहात काम करणाऱ्या शेफला लुटणाऱ्या चोरट्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी एका तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तबरेज उर्फ परवेज मुनीर शेख (वय २२, रा. जे. के. पार्क, कोंढवा), रमजान अब्बास पटेल (वय २४, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण कोंढव्यात राहतो आणि एका उपाहारगृहात शेफ म्हणून काम करतो. शनिवारी (१५ फेब्रुवारी) सकाळी चारच्या सुमारास तो कामावर जात असताना एनआयबीएम रस्त्यावरील मौर्य हाऊसिंग सोसायटीसमोर आरोपी तबरेज आणि त्याचा साथीदार रमजान दुचाकीवर आले. त्यांनी बंदुकीचा धाक दाखवत तरुणाला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुणाने प्रतिकार केला आणि झटापटीत चोरट्यांकडील बंदूक हिसकावून घेतली. या झटापटीत त्याचा शर्ट फाटला आणि चोरट्यांनी त्याचा मोबाइल हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला.

घडलेला प्रकार पाहता तरुण घरी परतला आणि त्याने उपाहारगृहातील वरिष्ठ शेफला घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी घटनास्थळी भेट दिली आणि तपास सुरू केला.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी पसार झालेल्या आरोपींना ओळखले आणि तबरेज व रमजान या दोघांना अटक केली. तपासादरम्यान, चोरट्यांनी तरुणाला धमकावण्यासाठी छऱ्याची बंदूक वापरल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर करत आहेत.

Leave a Reply

rushi