मोक्यातील फरारी आरोपीच्या बंडगार्डन पोलिसांची आवळल्या मुसक्या, कर्नाटकातून घेतले ताब्यात
मागील सहा महिन्यांपासून मोक्यातील फरारी आरोपीला बंडगार्डन पोलिसांनी कर्नाटक राज्यातील रायचूर येथून ताब्यात घेतले. सौरभ तिमप्पा धनगर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल आहे.
गणेश संजय पोळ (वय, २९, रा. ताडीवालारोड, पुणे) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, फिर्यादी गणेश पोळ हे मजुरीचे काम करतात. १८ ऑगस्ट सायंकाळी ६.४५ वाजता त्यांच्या दुचाकीवरून ते घरी जात होते. ते १३ ताडीवाला रोड येथील मारुती मंदिर चौकात आले असताना सौरभ तिमप्पा धनगर, आकाश राहुल पंडीत ऊर्फ झिंग्या व साहिल राजु वाघमारे ऊर्फ सोन्या यांनी त्यांची दुचाकी अडवली. त्यानंतर पोळ यांना फायटर लाकडी बांबू आणि दगडाने मारहाण केली. या मारहाणीत पोळ गंभीर जखमी झाले. या प्रकरणात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यातील आरोपींच्या विरोधात संघटीत गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आलेली होती, यातील आरोपी सौरभ तिमप्पा धनगर हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. त्यानंतर पोलिसांना बातमीदाराकडून सौरभ धनगर याच्याबद्दल माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उप-निरीक्षक स्वप्निल लोहार, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर बडे, पोलीस अंमलदार मनोज भोकरे यांच्या तपास पथकाने ६ डिसेंबर रोजी आरोपी सौरभ धनगर याला कर्नाटक राज्यातील रायचूर येथून ताब्यात घेतले. त्यानंतर ७ डिसेंबर रोजी आरोपीला बंडगार्डन पोलीस ठाण्यात हजर करून त्याला अटक करण्यात आली.