मुलाला अटक करण्याची धमकी घालून ज्येष्ठ नागरिकाची अडीच लाखांची फसवणूक
पुणे: मुलाला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत आणि सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची सुमारे अडीच लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ज्येष्ठ नागरिकाने याबाबत तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्येष्ठ नागरिक पर्वती परिसरात राहतात. २७ ऑगस्ट रोजी त्यांना धीरज कुमार नावाचा चोरट्याचा फोन आला. स्वतःला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागातील (सीबीआय) अधिकारी असल्याचा दावा करत, त्याने फिर्यादीच्या मुलाला बलात्काराच्या प्रकरणात अटक होणार असल्याची भीती घातली. इतकेच नव्हे, तर इतर नातेवाईकांनाही या गुन्ह्यात ओढण्याची धमकी दिली. पुढील कारवाई टाळण्यासाठी तात्काळ पैसे जमा करण्याचा सल्ला दिला. या दबावाखाली येऊन ज्येष्ठ नागरिकांनी चोरट्याच्या खात्यावर वेळोवेळी २ लाख ४९ हजार रुपये ट्रान्सफर केले. मात्र, काही काळानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सध्या या प्रकरणाचा तपास पोलीसांकडून सुरू असून सायबर चोरट्यांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.