मोटारचालकाने महिला पोलीस हवालदाराला फरफटत नेले, बंडगार्डन परिसरातील घटना

नाकाबंदी दरम्यान महिला पोलीस हवालदाराला मोटारचालकाने फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील बंडगार्डन रस्ता परिसरात मध्यरात्री हा प्रकार घडला. महिला पोलीस हवालदाराला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दीपमाला राजू नायर असे जखमी झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी विजयकुमार जगताप यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोटारचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मद्यपी वाहन वाहनचालकांमुळे शहरात अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांकडून दररोज नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी करण्यात येत आहे. मध्यरात्री बंडगार्डन परिसरात बंडगार्डन पोलीस आणि वाहतूक शाखेच्या पथकाने नाकाबंदी केली होती. वाहनचालकांची तपासणी सुरू होती. जहाँगीर रुग्णालयाकडून आलेल्या एका वाहनाला नायर यांनी थांबण्याची सूचना केली. एका बॅरीकेटजवळ त्या थांबल्या होत्या. मात्र मोटारीने बॅरीकेटला धडक दिली. या वाहनाने नायर यांना ५० ते ६० मीटर फरफटत नेले. या सगळ्या प्रकारात नायर यांना गंभीर दुखापत झाली. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

दरम्यान, वाहनचालक अपघातानंतर पसार झाला. त्याचा शोध घेण्यात येत आहे.

Leave a Reply

rushi