काळ्या जादूची भीती दाखवून ज्येष्ठ महिलेला २९ लाखांना गंडवले
पुणे : काळ्या जादूची भीती घालून बालेवाडी भागातील ज्येष्ठ महिलेची २८ लाख ७७ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
एका ज्येष्ठ महिलेने फिर्याद दिली असून दिलेल्या फिर्यादीनुसार, फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ महिला या ६२ वर्षीय असून त्या बालेवाडीतील एका सोसायटीत राहायला आहेत. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात एकाने ज्येष्ठ महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. ‘तुमच्या घरावर काळी जादू करण्यात आली आहे. घरात वास्तूदोष आहे. तुमच्या मुलीमधील दोष काढून देतो,’ अशी बतावणी त्याने केली. त्यानंतर महिलेला जाळ्यात ओढले. महिलेला काळ्या जादूची भीती घातली. घरावर असलेले संकट दूर करण्यासाठी काही विधी कराव्या लागतील असे सांगितले. तसेच महिलेकडून ऑनलाइन पद्धतीने पैसे मागितले. महिलेने एका बँक खात्यात वेळोवेळी २८ लाख ७७ हजार रुपये जमा केले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक अनिल केकाण तपास करत आहेत.