अभ्यास करत नाही म्हणून बापानेच केला पोराचा खून, आजीसमोरच आवळला गळा, भिंतीवर आपटले
अभ्यास करत नाही म्हणून बापाने पोटच्या पोराचा खून केल्याची घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील होळ या ठिकाणी मकरसंक्रांतीच्या दिवशी हा भयंकर प्रकार घडला. इतकच नाही तर हा गुन्हा लपवण्यासाठी घरच्या लोकांनी मदत केल्याचे देखील समोर आले आहे. पियुष विजय भंडलकर (वय ९) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.
या प्रकरणी वडील विजय गणेश भंडलकर आणि आरोपीची आई शालन गणेश भंडलकर व संतोष सोमनाथ भंडलकर (सर्व रा. होळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मकरसंक्रांतीच्या सणाच्या दिवशी (दि. १४) हा प्रकार घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, १४ जानेवारी रोजी दुपारी अडीचच्या सुमारास पियुष घरात असताना, वडील विजय भंडलकर यांनी त्याला अभ्यास करीत नसल्याने रागवत होते. “तू सारखा बाहेर खेळतोस, तुझ्या आईसारखा वागत माझी इज्जत घालवतोस,” असे म्हणून त्यांनी रागाच्या भरात पियुषला भिंतीवर आपटले. त्यानंतर गळा दाबून त्याचा खून केला.
घटना घडल्यावर पियुष याला संतोष भंडलकर याच्या मदतीने एका खाजगी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी पियुष याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तसेच होळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जाण्याचा सल्ला त्यांनी दिला. तेथेही मुलाचा मृत्यू चक्कर येऊन झाल्याचे सांगण्यात आले.
मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्रात न जाता पियुषचे प्रेत गावी नेले. मुलाच्या मृत्यूविषयी कोणालाही कळू नये म्हणून पोलीस पाटील किंवा इतरांना माहिती न देता थेट अंत्यविधीची तयारी नातेवाइकांच्या संगनमताने करण्यात आली. मात्र पोलिसांनी यात हस्तक्षेप केला. पियुषचा मृतदेह बारामती येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. तेव्हा त्याच्या डोक्यावर आघात झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले.
विशेष म्हणजे आरोपीची आई, पियुष याची आजी शालन भंडलकर हिने हा सगळा प्रकार बघून देखील मुलगा विजय याला प्रतिबंध केला नाही. उलट पियुष हा चक्कर येऊन पडल्याची खोटी माहिती तिने दिली. पोलिसांनी विजय भंडलकर आणि इतरांविरोधात खुनाचा आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.