तोतया पोलीस, मनी लाँड्रिंगची भीती आणि महिलेची तब्बल एक कोटी रुपयांची फसवणूक
पिंपरी : पोलीस असल्याची बतावणी करून आर्थिक गैरव्यवहाराच्या (मनी लाँड्रिंग) दोन कोटी रुपयांच्या गुन्ह्यात अटकेची भीती दाखवून वृद्ध महिलेची तब्बल एक कोटी १४ लाख रूपयांची फसवणूक केली. हा प्रकार सांगवी येथे २१ ऑक्टोबर ते २९ नाेव्हेंबर या कालावधीत ऑनलाइन माध्यमातून घडला. याप्रकरणी संबंधित महिलेने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बंधन, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक खातेधारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिला एका खासगी कंपनीतून उच्च पदावरून निवृत्त झाल्या आहेत.
फिर्यादी महिलेला आरोपींनी वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकाद्वारे दूरध्वनी केला. समाजमाध्यमातील व्हॉट्सअपवरुन दूरध्वनी करून पोलीस असल्याची बतावणी केली. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या गणवेशात वेगवेगळ्या नावाने पोलीस अधिकारी व मुंबई पोलीस असल्याची बतावणी केली. फिर्यादी यांना त्यांच्या नावाने असलेल्या मोबाइल क्रमांका विरोधात गंभीर स्वरुपाच्या १७ तक्रारी असल्याची भीती घातली. तसेच नरेश गोयल आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्यातील दोन कोटी रुपयांचे दरमहिना दहा टक्याप्रमाणे २० लाख रुपये कमिशन मिळाले असल्याचे सांगितले. याप्रकरणी अटक होण्याची भीती घालून वेगवेगळ्या बँक खात्यावर जबरदस्तीने एक कोटी १४ लाख २०, १८८ रुपये भरण्यास भाग पाडत त्यांची फसवणूक केली. सायबर पोलीस तपास करीत आहेत.