‘Apli PMPML’ चे बनावट अॅप; पीएमपीएमएलने उचलले कठोर पाऊल; प्रवाशांना सावध राहण्याचे आवाहन
पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) ने आपल्या अधिकृत मोबाईल अॅप “Apli PMPML” च्या बनावट अॅपची जाहिरात करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. यु-ट्युब, टेलिग्राम, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या समाजमाध्यमांवर बनावट अॅपच्या जाहिराती केल्या जात असून, काही अज्ञात व्यक्ती पीएमपीएमएलच्या प्रवाशांना आर्थिक फसवणूक करण्यासाठी “Apli PMPML” च्या बनावट अॅपचे प्रमोशन करत आहेत.
या बनावट अॅपचा वापर करून, प्रवाशांना पैसे न देता पास मिळवण्याचा आमिष दाखवले जात आहे. यातून प्रवाशांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. पीएमपीएमएलने याप्रकरणी पोलीस प्रशासनाच्या सायबर सिक्युरिटी सेल विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. सायबर सिक्युरिटी सेल व पीएमपीएमएलच्या तांत्रिक विश्लेषण टीमने या बनावट अॅपच्या जाहिरातींवर बारीक लक्ष ठेऊन आहे.
पीएमपीएमएलने प्रवाशांना सोशल मीडियावरील अशा बनावट अॅपच्या जाहिरातींना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच, या बनावट अॅपचा वापर करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.