एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर, फडणवीसांच्या हाती राज्याच्या चाव्या?
विधानसभा निकालानंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याबद्दल जोरदार चर्चा सुरू आहेत. आज महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन भाजपाचे वरिष्ठ जे ठरवतील ते आम्हाला मान्य असल्याचे सांगितले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला असल्याचे बोलले जात असून देवेंद्र फडणवीस यांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळेच पुढील मुख्यमंत्री फडणवीस हेच असतील अशा चर्चा आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री पदावरून निर्माण झालेला पेच अधिकच गंभीर झाला होता. मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा सुरू होती. याबाबत एकनाथ शिंदे यांनी आता खुलासा केला आहे. एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे स्पष्ट केले. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानत सत्तास्थापनेसाठी कोणतीही अडचण होणार नसल्याचे सांगितले.
शिंदे म्हणाले, “मी कोणतीही गोष्ट ताणून धरलेली नाही. पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री पदाबाबत घेतलेला निर्णय मी पूर्णपणे मान्य करीन. तसेच, पंतप्रधानांसोबत फोनवर चर्चा केली असून, त्यांना सत्तास्थापनेत आमच्या बाजूने कोणतीही अडचण येणार नाही, याची ग्वाही दिली आहे.”
तसेच, उद्या दिल्ली येथे अमित शाह यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस, अजित पवार, आणि एकनाथ शिंदे यांची बैठक होणार असल्याची माहितीही शिंदे यांनी दिली. या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून शिंदे यांनी माघार घेतल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा चेंडू थेट भाजपाच्या कोर्टात टाकल्याचे बोलले जात आहे.