राज कुंद्रा याच्या घरावर ईडीचा छापा, एकूण १५ ठिकाणी कारवाई
अंमलबजावणी संचलनालयाने (ED) बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याच्या घरावर आणि कार्यालयावर छापा टाकला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई पॉर्नोग्राफी प्रकरणाच्या तपासाअंतर्गत करण्यात आली आहे. ईडीने राज कुंद्रा याच्या घरावर तसेच या प्रकरणाशी संबंधित इतर व्यक्तींच्या घरांमध्येही शोधमोहीम राबवली आहे. हा तपास मोबाईल अॅपद्वारे पॉर्न सामग्री तयार करून ती प्रसारित करण्याच्या संदर्भात करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने ही कारवाई मुंबई आणि उत्तर प्रदेशातील जवळपास १५ ठिकाणी केली. ईडी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ही छापेमारी पॉर्नोग्राफी रॅकेटशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात केली गेली आहे. याआधीही या प्रकरणात पोलिसांनी राज कुंद्रा यांच्या विरोधात तपास केला होता. आता ईडीने हे प्रकरण आर्थिक गुन्ह्यांअंतर्गत तपासासाठी घेतले आहे. याआधी जुलै २०२१ मध्ये क्राइम ब्रँचने राज कुंद्रा याला अटक केली होती. नंतर त्याला न्यायालयाकडून जामीन देण्यात आला होता.
जामीन मिळाल्यानंतर राज कुंद्रा याने त्याच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचे म्हटले होते. ईडीच्या टीमने राज कुंद्रा याचे घर, कार्यालय आणि या प्रकरणाशी संबंधित इतर ठिकाणी छापेमारी केली. अधिकाऱ्यांनी अनेक कागदपत्रे, बँक रेकॉर्ड्स आणि डिजिटल उपकरणे जप्त केली असून त्यामधून या रॅकेटच्या माध्यमातून पैशांचे व्यवहार कसे केले गेले याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. तपासात आरोप आहे की, राज कुंद्रा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे पॉर्नोग्राफी व्हिडिओ तयार केले.
तसेच हे व्हिडिओ विविध अॅप्स आणि वेबसाइट्सवर अपलोड केले. या व्हिडिओमधून मिळालेल्या पैशांचा वापर मनी लाँडरिंगमध्ये करण्यात आला. याआधी राज कुंद्रा याच्यावर गैरकायदेशीर पॉर्न फिल्म्स तयार करून त्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर टाकल्याचा आरोप होता. या काळात शिल्पा शेट्टी हिचे नावही चर्चेत आले, मात्र ती या प्रकरणात आरोपी नव्हती. आता ईडीच्या छापेमारीनंतर नव्या आणि महत्त्वाच्या पुराव्यांची अपेक्षा आहे. अधिकाऱ्यांच्या मते, तपास अद्याप सुरू आहे आणि या प्रकरणात पुढे आणखी लोकांच्या अटक होण्याची शक्यता आहे.