महाराष्ट्रात पुन्हा ‘देवेंद्र’ पर्व; फडणवीस मुख्यमंत्री, शिंदे-पवार उपमुख्यमंत्री

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागल्यानंतर तब्बल तेरा दिवसांच्या प्रतिक्षेनंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (५ डिसेंबर) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

मुंबईतील आझाद मैदानावर या शपथविधीचा भव्य सोहळा पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्विकारली आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री तसेच उद्योगपती आणि अभिनेते उपस्थित होते. या शपथविधीनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात झाली आहे.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने अभूतपूर्व कामगिरी करत २८८ पैकी २३० जागांवर विजय मिळवला. भाजपने १३२ जागांवर यश मिळवत मोठा वाटा उचलला. महायुतीच्या या विजयामुळे मुख्यमंत्री भाजपचा असणार हे निश्चित होते. मात्र युतीतील अंतर्गत राजकारण आणि समन्वयासाठी तेरा दिवस विलंब झाला. अखेर, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मनधरणी करून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

महायुतीच्या ऐतिहासिक विजयासह भाजपने राज्यात आपले वर्चस्व सिद्ध केले असून, महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ:
मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वरसाक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबाबत मी खरी श्रद्धा आणि निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता आणि एकात्मता उन्नत राखेन. मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक आणि सद्सद्विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान आणि कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निःपक्षपातीपणे तसेच कुणाविषयीही ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन.

मी, देवेंद्र सरीता गंगाधरराव फडणवीस ईश्वरसाक्ष शपथ घेतो की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी हे खेरीज करुन मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तिंना कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही.
अशी शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.

एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी सहाव्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

Leave a Reply

rushi