मारकडवाडीमधील बॅलेट पेपरवर निवडणूकीच्या प्रक्रियेचा निर्णय मागे, गावात जमावबंदीचे आदेश
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी हे गाव निवडणूक प्रक्रियेमुळे चर्चेत आले आहे. गावकऱ्यांनी ईव्हीएमवरून नोंदवलेल्या निकालांना नाकारत बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी, अशी मागणी केली होती. सर्व खर्च आम्ही करतो, पण बॅलेट पेपरवरच मतदान पाहिजे, अशी ठाम भूमिका घेत ग्रामस्थांनी प्रशासनासमोर आपला निर्धार मांडला होता. मात्र, ही मागणी मान्य न झाल्याने ग्रामस्थांनी स्वतःच बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची तयारी सुरू केली होती.
ग्रामस्थांचा निर्धार आणि प्रशासनाचा हस्तक्षेप
मारकडवाडीत मंगळवारी (३ डिसेंबर) बॅलेट पेपरवर मतदान करण्याची प्रक्रिया सुरू होणार होती. गावातील नागरिकांनी तयारी करत ग्रामपंचायतीसमोर जमवाजमव सुरू केली होती. पण यामुळे परिस्थिती चिघळत असल्याने सोमवारी प्रशासनाने गावात कलम १४४ लागू करून जमावबंदीचा आदेश दिला. पोलिसांनी मतदान केल्यास साहित्य जप्त करण्याचा तसेच गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उत्तमराव जानकर यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांचे म्हणणे समजून घेतले. चर्चा केल्यानंतर ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान करण्याचा निर्णय मागे घेतला. या हस्तक्षेपामुळे गावातील तणाव कमी झाला आणि परिस्थिती नियंत्रणात आली.
बॅलेट पेपरची मागणी का?
भाजपचे राम सातपुते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तमराव जानकर यांच्यात माळशिरस मतदारसंघात झालेल्या लढतीत ईव्हीएमवरून आलेल्या निकालांवर गावकऱ्यांनी आक्षेप घेतला. गावात २४७६ पैकी १९०५ मतदारांनी मतदान केले होते. यामध्ये सातपुते यांना १००३, तर जानकर यांना ८४३ मते मिळाली. गावकऱ्यांचा दावा आहे की, यापूर्वी ग्रामस्थांनी नेहमी जानकर किंवा मोहिते-पाटील यांनाच मताधिक्य दिले होते. त्यामुळे ईव्हीएमवर आलेले निकाल गावकऱ्यांना अमान्य होते आणि त्यांनी बॅलेट पेपरची मागणी केली होती.
दरम्यान, भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी ही मागणी फक्त “राजकीय स्टंटबाजी” असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्यानुसार, गावकऱ्यांच्या आक्षेपांना कोणताही आधार नाही.