पुण्यात कोयत्याची दहशत सुरुच; दोघांवर हल्ला, हाताचा पंजा तुटला
पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कोयत्याची दहशत दाखवून धाक दाखवणे, कोयत्याच्या सहाय्याने हल्ला करणे, वाहनांची तोडफोड करणे असे प्रकार सर्रास होताना दिसत आहेत. अशीच एक घटना बिबवेवाडी भागात घडली आहे. दोन जणांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना परिसरात सोमवारी दुपारी घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
गौरव राजेश मरकड (वय २४, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) आणि त्याचा मित्र पियुष पाचकुडवे (वय २२, रा. सुपर इंदिरानगर) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
या प्रकरणी गौरव राजेश मरकड (वय २४, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) याने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अल्पवयीन मुलासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर मिथिलेश सरोज (वय २१, रा. वडकीनाला, पुणे) असे अटक झालेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, फिर्यादी गौरव मरकड आणि आरोपी सागर यांच्यात वाद आहेत. एकमेकांना रागाने बघितल्याच्या कारणावरून त्यांच्यात भांडणं झाली होती. आपसातील वाद मिटवण्याचा बहाणा करून आरोपींनी गौरवला आणि त्याच्या मित्राला सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास अप्पर इंदिरानगर येथील शिवतेज क्रीडा संघ चौकात बोलावले होते. गौरव आणि पियुष तिथे पोहोचले. तेथे पुन्हा त्यांच्यात वाद झाला. आरोपी सागर आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराने पियूषवर कोयत्याने वार केले. त्यानंतर दोन्ही आरोपी तिथून पसार झाले.
या हल्ल्यात पियूषच्या हाताचा पंजा तुटून वेगळा झाला. त्यावेळी गौरव हा पियूषला वाचविण्यासाठी गेला. परंतु आरोपींनी त्याच्याही डोक्यावर आणि खांद्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांची प्रकृती स्थिर आहे.
आरोपींनी केलेल्या या हल्ल्यात गौरव आणि पियुष दोघेही गंभीररित्या जखमी झाले आहेत. पियूषच्या हाताचा पंजा तुटून वेगळा झाला आहे. गौरव हा पियूषला वाचविण्यासाठी गेला. परंतु आरोपींनी त्याच्याही डोक्यावर आणि खांद्यावर कोयत्याने वार केले. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोघांची प्रकृती स्थिर आहे
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी सागरला अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.