महाविद्यालयीन तरुणांमध्ये सेंट्रल मॉलजवळ तुंबळ हाणामारी, कोयत्याने केले वार, दोघे जखमी
पुण्यातील सेंट्रल मॉलजवळ गरवारे महाविद्यालयातील तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. या हाणामारीत २२ वर्षांचे दोन महाविद्यालयीन तरुण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तरुणींशी बोलण्यावरून दोन गटांत हा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. या हाणामारीत ७ ते ८ जणांनी दोघांवर कोयत्याने वार केले.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, गरवारे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये तरुणींशी बोलण्यावरून हा वाद झाला. गरवारे महाविद्यालयातील दोघे जवळच्याच सेंट्रल मॉल जवळ उभे होते. तेवढ्यात ७ ते ८ जण तिथे आले. त्यांनी त्यामधल्या एका तरुणाला चावीने मारले. तसेच त्याला तिथून निघून जाण्यासाठी सांगितले. त्याच्याकडे दुचाकीची चावी नव्हती. त्यामुळे तो तिथेच थांबून राहिला. त्यामुळे टोळक्यातील एकाने कोयता काढून त्याच्या डोक्यावर वार केले. तसेच त्याच्या मित्रावरही कोयत्याने वार केले. जखमी दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच, पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल, डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशा निंबाळकर यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. या प्रकरणी जाबजबाव घेण्याचे काम सुरु आहे. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे गिरीशा निंबाळकर यांनी सांगितले.