पिंपरीतील महाविद्यालयीन युवक मुळशी धरणात बुडाले; पोलीस, ग्रामस्थांकडून शोध सुरू
पुणे: मुळशी धरणात पिंपरी-चिंचवड परिसरातील दोन महाविद्यालयीन युवक बुडाल्याची घटना घडली आहे. रविवारी दोघे जण धरण परिसरात फिरायला गेले होते. धरण परिसरात दोन्ही युवकांचा शोध घेण्यात येत आहे.
अनिश राऊत (वय १८, रा. पिंपरी), विशाल राठोड (वय १७, रा. चिंचवड) अशी मृत्युमुखी पडलेल्या युवकांची नावे आहेत.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिश आणि विशाल हे महाविद्यालयीन युवक आहेत. रविवारी ते आपल्या इतर मित्रांबरोबर मुळशी धरण परिसरात फिरायला आले होते. चाचिवली-ढोकळवाडी परिसरात धरणात पोहण्यासाठी ते उतरले होते. मात्र खोलीचा अंदाज न आल्याने अनिश आणि विशाल बुडाले. त्यानंतर इतर मित्रांनी या घटनेची माहिती गावकऱ्यांना दिली. माहिती प्राप्त होताच पौड पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांसोबतच हिंजवडीतील पाणबुड्यांचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आणि गावकऱ्यांनी बुडालेल्या तरुणांचा तातडीने शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र अंधार पडल्याने शोधमोहीम थांबवण्यात आली होती.