काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल
मुंबई: राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मागील काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांना मंगळवारी दुपारी ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांच्या काही तपासण्या केल्या असून डेंग्यू आणि मलेरियाच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. मात्र, ताप कमी-जास्त होत असल्याने आणि अंगात कणकण व घशात इन्फेक्शन असल्यामुळे डॉक्टरांनी रुग्णालयात राहण्याचा सल्ला दिला आहे.
शिंदे यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी आगामी सर्व महत्त्वाच्या बैठका रद्द केल्या आहेत. त्यांच्या आजारपणामुळे राज्यातील मंत्रिमंडळ स्थापनेच्या चर्चांवर परिणाम होत असल्याची चर्चा आहे. राज्यात महायुती सरकारचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबर रोजी होणार असून या सोहळ्याला विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीमुळे ते या सोहळ्याला उपस्थित राहू शकतील की नाही, याबाबत संभ्रम कायम आहे.
राज्यात महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी चर्चांना वेग आला आहे. मुख्यमंत्री पदावरून अद्याप निर्णय झालेला नसून उपमुख्यमंत्री पद व गृहमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे आग्रही असल्याची चर्चा आहे. शिवसेना नेते गुलाबराव पाटील आणि संजय शिरसाट यांनीही शिंदे यांना गृहमंत्री पद देण्याची मागणी केली आहे.