विश्रांतीसाठी गावी आलो, भाजपच्या निर्णयाला पाठिंबा – एकनाथ शिंदे; गृहखात्यावर मौन
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सात दिवस उलटून गेले तरी सत्ता स्थापना झालेली नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपला मुख्यमंत्री पद गेल्यामुळे नाराज असल्याने सत्ता स्थापनेला उशीर होत असल्याची चर्चा आहे. अशातच शिंदे आपल्या गावी निघून गेल्यामुळे चर्चांना अधिकच उधाण आले होते. अशातच शिंदे यांनी या सर्व चर्चांवर स्पष्टीकरण दिले असून भाजपच्या निर्णयाला आपला संपूर्ण पाठिंबा असेल याचा पुनरुच्चार केला आहे.
आपण गावाकडे आराम करण्यासाठी गेलो होतो. निवडणुकीच्या काळात खूप धावपळ झाल्याने मागील काही काळापासून प्रकृती खराब होती. त्यामुळे गावी गेलो. मी नेहमीच गावी येत असतो. सत्ता स्थापन होताना गावी याचे नाही का? असा सवाल शिंदे यांनी केला. आज ते त्यांच्या दरे या गावी माध्यमांशी बोलत होते.
मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे घेतील. माझी भूमिका मी आधीच स्पष्ट केली होती. भाजपचे वरिष्ठ जो निर्णय घेतील तो शिवसेनेला मान्य असेल असे सांगत महायुती मध्ये समन्वयाचा अभाव नाही. तसेच आमच्या मनात किंतू-परंतू नाही आणि इतर कुणाच्याही मनात नसावा असे शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले. परंतु गृहखात्याबद्दल त्यांना विचारले असता त्यांनी त्याविषयी बोलण्यास टाळले. त्यामुळे शिंदे हे गृहखात्यासाठी आग्रही असल्याचे बोलले जात आहे.
आमची एक बैठक अमित शहांसोबत झाली होती. आता आमची तिघांची बैठक होईल आणि यातून महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला जाईल. राज्याने आम्हाला खूप दिले आहे. राज्यात लवकर चांगले सरकार स्थापन व्हावे अशी जनतेची इच्छा आहे. लोक काय बोलतात, विरोधक काय बोलतात, ह्याच्याशी आम्हाला घेणं-देणं नसल्याचे शिंदे म्हणाले.