पुणे पोलिसांची मोठी कार्यवाही; हरवलेले ४५६ मोबाईल नागरिकांना परत

पुणे: शहरात हरवलेले मोबाईल शोधून देण्याच्या दिशेने पुणे पोलिसांनी मोठे पाऊल उचलले आहे. सी.ई.आय.आर. पोर्टलवर आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने हरवलेले ४५६ मोबाईल शोधून काढत पोलिसांनी ते त्यांच्या मूळ मालकांकडे परत केले. या कारवाईमुळे मोबाईल मिळालेल्या नागरिकांनी आनंद व्यक्त केला असून, पुणे पोलिसांच्या तत्परतेचे आणि कार्यक्षमतेचे विशेष कौतुक केले आहे.

पुणे पोलिसांनी नागरिकांसाठी ‘लॉस्ट अँड फाउंड’ हे विशेष पोर्टल उपलब्ध करून दिले आहे, जिथे हरवलेले किंवा गहाळ झालेले मोबाईल शोधण्यासाठी तक्रारी नोंदवता येतात. या तक्रारीनंतर नागरिकांना ‘प्रॉपर्टी मिसिंग’चा ऑनलाईन दाखला मिळतो. आधारकार्डसह नागरिकांनी ही माहिती सी.ई.आय.आर. केंद्रीय पोर्टलवर नोंदवावी लागते. त्यानंतर पोर्टलच्या माध्यमातून मोबाईलच्या आयएमईआय क्रमांकावर तांत्रिक विश्लेषण करून सद्यस्थितीत त्यात कार्यरत असलेल्या सिमकार्डचा शोध घेतला जातो. ही संपूर्ण प्रक्रिया पोलीस विभागाच्या मदतीने राबवली जाते.

हरवलेले मोबाईल शोधण्यासाठी गुन्हे शाखा, संगणक शाखा आणि सायबर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची सहा विशेष पथके गठीत करण्यात आली. गेल्या महिन्यात या पथकांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे २३०० तक्रारींची तपासणी केली, त्यापैकी ४५६ मोबाईल यशस्वीपणे शोधण्यात आले. पुणे शहराबाहेर ट्रेस झालेले मोबाईल शोधण्याचे कामही सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

१४ फेब्रुवारी रोजी पोलीस मुख्यालयातील हिरकणी हॉल येथे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते हरवलेले मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आणि पोलिसांचे आभार मानले.

हरवलेले मोबाईल परत मिळाल्यामुळे अनेक नागरिकांनी पोलिसांच्या मेहनतीचे कौतुक केले. पुणे पोलिसांनी केलेल्या या उल्लेखनीय कार्यवाहीमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, अशाच तत्पर सेवेसाठी पोलिसांची प्रशंसा केली जात आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे, विवेक मासाळ, सहाय्यक आयुक्त मच्छींद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, टीम १ चे राहूल शिंदे, किरण जमदाडे, संदिप कोळगे, टीम २ चे प्रमोद टिळेकर, विशाल इथापे, मनोज सांगळे, टीम ३ चे चेतन चव्हाण, नितीन जगदाळे, टीम ४ चे राजेंद्र पुनेकर, लटू सुर्यवंशी, समीर पिनाणे, टीम ५ चे इश्वर आंधळे, सुनयना मोरे, लोकेश्वरी चुटके, टीम ६ चे किरण गायकवाड, सचिन शिंदे, कल्याणी कोळेकर तसेच सुषमा तरंगे, दिनेश मरकड, अमर बनसोडे, आदनान शेख या सायबर पोलीस ठाणे, संगणक शाखा व गुन्हे शाखेकडील पोलीस पथकाने यशस्वी रित्या पार पाडली.

Leave a Reply

rushi