हिंजवडी परिसरात भरधाव डंपर दुचाकीवर उलटला; दोन विद्यार्थिनींचा चिरडून दुर्दैवी मृत्यू
हिंजवडी – माण रस्त्यावरील वडजाईनगर कॉर्नरजवळ शुक्रवारी (दि. २४) सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव वेगाने जाणाऱ्या रेडिमिक्स डंपरचा चालक वळण घेताना नियंत्रण गमावून बसला आणि डंपर पलटी होऊन दुचाकीवरून जाणाऱ्या दोन विद्यार्थिनींच्या अंगावर कोसळला. या दुर्घटनेत दोघींचा जागीच मृत्यू झाला.
प्रांजली महेश यादव (वय २२, रा. गोदरेज प्रॉपर्टीज, म्हाळुंगे, ता. मुळशी, मूळगाव टेंभूर्णी, जि. सोलापूर) आणि अश्लेषा नरेंद्र गावंडे (वय २२, रा. गोदरेज प्रॉपर्टीज, म्हाळुंगे, ता. मुळशी, मूळगाव शेगाव, अमरावती) अशी मृत विद्यार्थिनींची नावे आहेत. त्या दोघी एमआयटी कॉलेजमध्ये विज्ञान शाखेच्या अंतिम वर्षाला शिक्षण घेत होत्या. दरम्यान, पोलिसांनी २२ वर्षीय डंपरचालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
अपघातानंतर घटनास्थळी हिंजवडी पोलीस, वाहतूक पोलीस आणि अग्निशामक दल तातडीने दाखल झाले. तीन क्रेनच्या मदतीने डंपर बाजूला करण्यात आला. या अपघातामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली तसेच बघ्यांची गर्दी जमली होती.
पलटी झालेल्या डंपरमध्ये तब्बल ३२ टन सिमेंट भरलेले होते. चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवताना नियंत्रण गमावल्यामुळे हा भीषण अपघात घडला. जड सिमेंटखाली दबल्याने दोन्ही विद्यार्थिनींचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह इतक्या गंभीर अवस्थेत होते की, अग्निशमन दलाच्या जवानांना त्यांचे तुकडे गोळा करताना भावनिक धक्का बसला.
अपघाताच्या वेळी त्या ठिकाणी एक तरुण दुचाकीवरून जात असताना त्याने प्रसंगावधान राखत दुचाकी ताबडतोब सोडून पळ काढला आणि तो थोडक्यात बचावला. काही क्षण उशीर झाला असता, तर त्याचा देखील अपघातात समावेश झाला असता.