सीआयडीला शरण येण्यापूर्वी बीड हत्याकांडातील आरोपी पुण्याला पळाले? सीसीटीव्ही फुटेज आले समोर
खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड व इतर आरोपी सीआयडीला शरण येण्यापूर्वी बीडवरून पुण्याला गेल्याचे समोर आले आहे. या संदर्भात तीन आलिशान गाड्यांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या व्हिडिओमुळे हा सर्व प्रकार उघड झाला आहे.
३० डिसेंबरच्या रात्री, सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरून तीन आलिशान गाड्यांमध्ये आरोपी पुण्याला गेले असल्याची चर्चा आहे. तपासादरम्यान, बीडच्या मांजरसुंबा येथे आरोपींनी एका हॉटेलवर जेवण केल्याची तसेच एका पेट्रोल पंपावर गाडीत डिझेल भरल्याची माहिती मिळाली आहे.
या गाड्या धाराशिव जिल्ह्यातील पारगाव टोल नाक्यावरून रात्री १.३६ वाजता गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले आहे. या गाड्यांचा वापर आरोपींना फरार होण्यासाठी करण्यात आला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
विशेष म्हणजे, पाषाण येथील सीआयडीच्या ऑफिसला शरण येताना ज्या गाडीतून वाल्मिक कराड आला, ती गाडी याच ताफ्यातील असल्याचे बोलले जात आहे.