पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला; तक्रार घेण्यास सुरुवातीला टाळाटाळ, पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर गुन्हा दाखल
पुणे: ड्यूटी संपवून रात्री कामावरून घरी जात असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यावर मद्यधुंद टोळक्याने हल्ला करून गंभीर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पोलीस कर्मचाऱ्याने तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरुवातीला पोलिसांकडून टाळाटाळ करण्यात आली. अखेर पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस हवालदार चंद्रकांत जाधव (वय ४२, रा. रामोशीवाडी) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रुपेश मांजरेकर (वय २५), अनिकेत राजेश चव्हाण (वय २१), अनिकेत घोडके (वय २४ ), अभि डोंगरे (वय २४, सर्व रा. रामोशीवाडी, वडारवाडी) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
फिर्यादी चंद्रकांत जाधव हे सहकारनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. गुरुवारी रात्री ते कामावरून घरी निघाले होते. सेनापती बापट रस्त्यावरील रत्ना हॉस्पिटल जवळ त्यांच्या घरापाशी रस्त्याच्या कडेला चौघे आरोपी दारू पिऊन गोंधळ घालत होते. यावेळी जाधव यांनी त्यांना हटकले. तेव्हा आरोपींनी जाधव यांना शिव्या घालण्यास सुरूवात केली. जाधव यांना मारहाण करण्यात आली. तसेच त्यांना रिक्षात ओढून नेले. तिथे त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांना कपाळावर दगडाने मारले. रिक्षातून बाहेर येऊन जाधव यांनी आरोपींचे मोबाइलद्वारे फोटो काढले. आरोपींनी त्यांचा मोबाइल हिसकावला आणि दुचाकीवरुन तिथून पळ काढला. जाधव हे चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले. तेव्हा उद्या या प्रकरणाची तक्रार द्या असे सांगून जाधव यांना वैद्यकीय तपासणीसाठी ससून येथे पाठवले.
दुसऱ्या दिवशीही त्यांची तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. बराच वेळ बसवून ठेवण्यात आले. पोलीसांच्या ‘तरंग’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून तुम्ही तक्रार नंतर दाखल करा असे त्यांना सांगण्यात आले. तसेच जाधव यांनी तक्रार दाखल करू नये म्हणून या भागातील एका राजकीय नेत्याने दबाव टाकला.
पोलीस आयुक्तांनी काढली खरडपट्टी
या घटनेबद्दल जाधव यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कानावर ही घटना पोहचली. त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना बोलावून खरडपट्टी काढल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर पोलिसांनी हालचाल करून चौघांना अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने चौघा आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.