पुन्हा ‘देवेंद्र पर्व’, फडणवीसांची विधिमंडळ गटनेते निवड, उद्या घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर विधिमंडळ गटनेते म्हणून शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांचे नाव अंतिम करण्यात आले. या बैठकीसाठी भाजपचे निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमण कालच मुंबईत दाखल झाले होते. विधिमंडळ गटनेत्याचा प्रस्ताव सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांनी मांडला, ज्याला उपस्थित सर्व आमदारांनी एकमताने मंजुरी दिली.

यामुळे आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदावर विराजमान होणार असून, गुरुवारी संध्याकाळी 5.30 वाजता मुंबईतील आझाद मैदानावर नव्या मुख्यमंत्र्यांचा भव्य शपथविधी सोहळा पार पडणार आहे. कोअर कमिटीची बैठक संपल्यानंतर निर्मला सीतारमण, विजय रुपाणी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर सेंट्रल हॉलमध्ये विधिमंडळ गटनेतेपदासाठी फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 11 दिवस झाले असले तरी महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी अद्याप पार पडलेला नव्हता. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर होण्यास विलंब झाला होता. भाजपच्या गटनेतेपदासाठी कोणाची निवड होणार, याबाबतही स्पष्टता नव्हती. आज पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर ही सर्व अनिश्चितता संपली असून, फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. गुरुवारच्या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. अनेक संत-महंत, इतर राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. महायुतीचे प्रमुख नेते आज सत्तास्थापनेसाठी राज्यपालांच्या निवासस्थानी जाणार असल्याचीही माहिती मिळाली आहे.

शपथविधी सोहळ्यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात तब्बल अर्धा तास चर्चा झाली. या बैठकीला गिरीश महाजन देखील उपस्थित होते. बंद दाराआड झालेल्या या चर्चेत खातेवाटप, शपथविधी आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे समोर आले आहे. मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदे महायुतीत नाराज असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, या बैठकीनंतर शिंदेंनी आपला निर्णय बदलल्याचे समजते. महायुतीत सरकार स्थापनेच्या प्रक्रियेदरम्यान गृहखात्यावरून रस्सीखेच सुरू होती. पण आता यावर तोडगा निघाला आहे. गृहखात्याऐवजी नगरविकास खाते आणि आणखी एक महत्त्वाचे खाते एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Leave a Reply

rushi