दहावीच्या विद्यार्थिनीचे अपहरण करणाऱ्या आरोपीस ठोकल्या बेड्या

लोणी काळभोर : दहावीच्या विद्यार्थिनीला फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली होती. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) परिसरात सोमवारी (ता.27) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या गुन्ह्यातील अपहरण करणाऱ्या आरोपीला लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या 24 तासाच्या आत खडकी (पुणे) परिसरातून मंगळवारी (ता.28) अटक केली आहे. रितेश राहुल कांबळे (वय- 21 रा. रेंज हिल, खडकी पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या 38 वर्षीय आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी ही १५ वर्षाची असून लोणी काळभोर परिसरातील एका शाळेत दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. विद्यार्थिनी ही सोमवारी दुपारच्या सुमारास दुकानामध्ये जावून येते असे सांगुण गेली होती. परंतु, अज्ञात इसमाने विद्यार्थिनीच्या अज्ञात पणाचा फायदा घेऊन तिला कशाची तरी फूस लावुन पळवून नेले आहे. अशी फिर्याद मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम137(2) प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी सदर गुन्ह्याची उकल करून आरोपींना पकडण्याच्या सूचना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या तपास पथकाला दिल्या. सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना, पथकाला पिडीत मुलीला आरोपी रितेश कांबळे याने अपहरण करून पळवून नेल्याची माहिती एका खबऱ्या मार्फत मिळाली.

त्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे लोकेशनाच्या आधारे आरोपीचा ठावठिकाणा काढला. आणि खडकी (पुणे) परिसरात छापा टाकून आरोपीला मोठ्या शिताफीने मंगळवारी (ता.28) बेड्या ठोकल्या आहेत. लोणी काळभोर पोलिसांनी अल्पवयीन मुलीला तिच्या पालकांच्याकडे स्वाधीन केले आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके करीत आहेत.

ही उल्लेखनीय कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलीस हवालदार विलास शिंदे, सुनील नागलोत व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

Leave a Reply

rushi