घरात घुसून दहशत माजवणारा आरोपी जेरबंद, गुन्हे शाखा युनिट ६ ची कामगिरी
पुणे : पुणे शहरातील गुन्हे शाखा युनिट ६ ने मोठी कारवाई करत दहशत माजवणाऱ्या एका आरोपीला जेरबंद केले आहे. १४ डिसेंबर रोजी युनिट ६ च्या पोलिस पथकाला गस्त घालताना माहिती मिळाली की, बिबवेवाडी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी अक्षय महादेव बनसोडे (वय २६, रा. संतोष मित्र मंडळ, लक्ष्मी नगर, येरवडा, पुणे) वाघोली येथील बेफ रस्ता येथे आला आहे. यावरून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ डिसेंबर २०२४ रोजी आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी संगनमत करून कोयते हातात घेऊन फिर्यादीच्या घरात घुसून दहशत माजवली. या घटनेत फिर्यादी यांचा मुलगा आणि पत्नी गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यानुसार आरोपी अक्षय बनसोडे विरोधात बिबवेवाडी पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीला अधिक तपासासाठी बिबवेवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे), युनिट ६ चे पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मदन कांबळे, पोलिस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, रमेश मेमाणे, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, गणेश डोंगरे, बाळासाहेब तनपुरे, प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली