जैन साधकाच्या वेषात जैन मंदिरांमध्ये चोरी करणारा आरोपी जेरबंद

स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत जैन मंदिरांमधील देवाचे सोन्याचे दागिने चोरून नेणाऱ्या एका सराईत चोरट्याला अटक करण्यात आली आहे. या आरोपीने स्वतःला जैन साधकाच्या वेषात सादर करून चोरी केल्याचे उघड झाले आहे. नरेश आगरचंद पौन (रा. बॉम्बे चाळ, गिरगाव, व्हिपी रोड, मुंबई ४) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

१५ नोव्हेंबर रोजी स्वारगेट पोलीस ठाण्यात घरातील जैन मंदिरातील सोन्याचे मुकुट व सोन्याची चेन चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती. फिर्यादी जय परेश पारेख यांनी त्यांच्या घरातील जैन मंदिरातील दागिने चोरीला गेल्याचे कळवले. त्याच दिवशी स्वारगेट परिसरातील इतर जैन मंदिरांमध्येही चोरीचे प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आले.

कार्तिक पौर्णिमेनिमित्ताने जैन बांधव मंदीरांमध्ये समारंभपूर्वक पूजाअर्चा करतात. या दिवशी मंदीरांमध्ये समारंभ साजरा केला जातो. याच दरम्यान चोऱ्या झाल्यामुळे धार्मिक भावना लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास सुरू झाला. आरोपी मुंबईच्या गिरगाव परिसरात असल्याची माहिती स्वारगेट पोलीस स्टेशनचे सागर केकाण यांना बातमीदारकडून मिळाली. ही माहिती तत्काळ वरिष्ठांना देण्यात आली. स्वारगेट पोलीस पथकाने तत्काळ गिरगावला जाऊन नरेश आगरचंद पौन याला अटक केली. चौकशीदरम्यान त्याने पैशांच्या चणचणीमुळे चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीला गेलेले सोन्याचे मुकुट व चैन, अंदाजे ४ लाख २० हजार रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले.

आरोपी नरेश हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी घाटकोपर, वाई, चिखली, डोंबिवलीसह इतर भागांमध्ये ८ ते १० मंदिरांत घरफोडीचे गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. मंदिरांमध्ये जैन साधकांच्या वेषात प्रवेश करून देवाचे दागिने चोरणे, हा त्याचा विशिष्ट पद्धतीचा गुन्हा आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वानकडे करत आहेत.

शा चोरीच्या अन्य घटनांबाबत माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधन्याचे आवाहन स्वारगेट पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

rushi