अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून ३६ तासांत आरोपीला अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी

पुणे: आंबेगाव पठार येथील चिंतामणी चौकाजवळ एका निर्माणाधीन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एका व्यक्तीचा निर्घृण खून करण्यात आला होता. या घटनेतील अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून, अवघ्या ३६ तासांत आरोपीला पश्चिम बंगाल येथून अटक करण्यात आली. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने ही उल्लेखनीय कारवाई केली आहे.

खून झालेल्या व्यक्तीचे नाव नयन गोरख प्रसाद (वय ४५, मुळ रा. बिहार) असे असून, या प्रकरणी राहुल लक्ष्मण आवारी यांनी फिर्याद दाखल केली होती. तपासादरम्यान बिरण सुबल करकर उर्फ बिरण सुबल कर्माकर (वय ३०, मुळ रा. पश्चिम बंगाल) याने हा खून केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीला पश्चिम बंगाल येथे जाऊन अटक केली.

घटनास्थळी आढळलेल्या मृतदेहाची अवस्था अत्यंत वाईट होती. शरीर कुजल्यामुळे मृताचे ओळख पटवणे कठीण झाले होते. नागरिकांकडे चौकशी करूनही काही महत्त्वाची माहिती मिळाली नाही. मात्र, घटनास्थळी सापडलेल्या रक्ताने माखलेल्या मोबाइल फोनच्या तांत्रिक तपासातून मृताचे नाव नयन गोरख प्रसाद असल्याचे स्पष्ट झाले. अधिक तपासात आरोपी कर्माकरचा या खूनातील सहभाग उघडकीस आला.

तपासादरम्यान आरोपी पश्चिम बंगालला पसार झाल्याचे समजले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मंगेश पवार, अभिनय चौधरी यांनी पश्चिम बंगाल गाठले. तिथे हावडा रेल्वे स्थानक परिसरात आरोपी कर्माकर याचा शोध घेऊन १२ फेब्रुवारी रोजी हावडा येथील गोलाबारी पोलीस ठाण्याच्या मदतीने त्याला अटक करण्यात आली.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त स्मार्तना पाटील, विवेक मासाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर, पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे, तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार चेतन गोरे, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सम्पाले, निलेश खैरमोडे, सचिन गाडे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

rushi