पेट्रोल चोरत असल्याच्या संशयावरून तरुणाला मारहाण, उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू
पेट्रोल चोरी करत असल्याच्या संशयावरून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीत जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांकडून एका उपसरपंचासह चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
समर्थ नेताजी भगत (वय २०, रा. अभिनव कॉलेज रोड, नऱ्हे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी नेताजी सोपान भगत यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, नऱ्हे परिसरातील उपसरपंच सुशांत कुटे, गौरव संजय कुटे, अजिंक्य चंद्रकांत गांडले, राहुल सोमनाथ लोहार ज्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नऱ्हे परिसरातील मानाजी नगर या भागात २५ नोव्हेंबर रोजी सकाळी सहाच्या सुमारास नऱ्हे भागातील माजी उपसरपंच सुशांत कुटे यांच्या कार्यालयासमोर समर्थ भगत याच्या दुचाकी मधील पेट्रोल संपले. त्यामुळे तो दुसऱ्या दुचाकी मधून पेट्रोल काढत होता. यावेळी आरोपी गौरव संजय कुटे आणि त्याच्या साथीदारांनी समर्थला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर समर्थला रुग्णालयात दाखल करण्यात आले. नुकताच समर्थचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यानंतर त्याच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान या घटनेचा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला असून सुशांत कुठे हा फरार असल्याची माहिती समोर आली आहे.