नारायण पेठ पोलीस चौकीजवळच ज्येष्ठाचा मोबाइल हिसकावला
केळकर रस्त्यावरील नारायणपेठ पोलीस चौकीजवळ एका पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मोबाइल चोरट्याने हिसकावून नेण्याची घटना घडली आहे. थेट पोलीस चौकीच्या जवळच हा प्रकार घडल्याने सर्वत्र या घटनेची चर्चा होत आहे.
या प्रकरणी एका ज्येष्ठ नागरिकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्येष्ठ नागरिक नारायण पेठेतील एका सोसायटीत वास्तव्यास् आहेत. दोन दिवसांपूर्वी जेवणानंतर रात्री पावणे अकराच्या सुमारास ते फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडले. तेव्हा चोरट्याने नारायणपेठ पोलीस चौकीजवळ त्यांचा मोबाइल फोन चोरून नेला. मोबाइल चोरल्यानंतर तो चोरटा पळून गेला. चोरट्याचे वय अंदाजे २० ते २२ वर्ष आहे असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
मागील काही काळापासून शहरात सातत्याने मोबाईल चोरीच्या घटना घडत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. चोरी झालेल्या मोबाईलांचा तपास लागणे मुश्किल होऊन बसले आहे. तसेच, चोरीचे मोबाईल अनेकदा परराज्यात विक्रीसाठी पाठवले जात असल्याचे देखील समोर आले आहे. पुणे पोलिसांनी गेल्या काही दिवसांपूर्वी चोरीच्या मोबाईलसाठी तपास मोहिम सुरू केली होती. अशा मोहिमांची आवश्यकता असल्याची पुणेकरांची मागणी आहे.