डिलिव्हरी बॉयच्या वेशात घरफोडी करणारा चोरटा साथीदारांसह गजाआड; सोने, हिऱ्यांसह पिस्तूल जप्त
पुणे : डिलिव्हरी बॉयचा वेश परिधान करून घरफोड्या करणाऱ्या एका टोळीला स्वारगेट पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ८० लाख रुपयांच्या मुद्देमालासह तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी गणेश मारुती काठेवाडे (वय ३७, रा. मुखेड, जि. नांदेड) याच्यासह सुरेश बबन पवार (वय ३५, रा. बालाजीनगर, धनकवडी, पुणे) आणि सराफ व्यवसायिक भीमसिंग उर्फ अजय करणसिंह राजपूत (वय ३९) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून ८६० ग्रॅम सोन्याचे दागिने, १५० हिरे, साडे तीन किलो चांदी, दोन पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे, दुचाकी आणि घरफोडीचे साहित्य जप्त केले आहे.
स्वारगेट परिसरात १९ डिसेंबर रोजी एका घरफोडीची घटना घडली होती. तपास पथकाने १६०० ते १७०० सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयिताचा माग काढला. यात गणेश काठेवाडे याचा वेश बदललेला अस्पष्ट फोटो दिसला. कोंढवा परिसरातील उंड्री येथून काठेवाडेला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने डिलिव्हरी बॉयचा वेश परिधान करून बंद सदनिकांची पाहणी करून १४ ठिकाणी घरफोडी केल्याचे कबूल केले. तसेच स्वारगेट एसटी स्थानकात प्रवाशांच्या मालमत्तेची चोरी केल्याचेही उघड झाले.
काठेवाडे याने चोरी केलेले दागिने सुरेश पवार याच्याकडे दिले. पवार हा सराईत गुन्हेगार आहे. तसेच तो मुळशी तालुक्यातील अंबडवेट गावाचा माजी उपसरपंच असून, खून व खुनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. पवार याने हे दागिने सराफ भीमसिंग राजपूत याच्या मार्फत विकल्याचे चौकशीत समोर आले. पोलिसांनी पवारकडून दोन पिस्तूल, पाच काडतुसे आणि अन्य साहित्य जप्त केले आहे.
परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी या कारवाईची माहिती माध्यमांना दिली. सहाय्यक आयुक्त राहुल आवारेही यावेळी उपस्थित होते.
स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राहुल कोलंबीकर, उपनिरीक्षक रवींद्र कस्पटे, संजय भापकर, श्रीधर पाटील, कुंदन शिंदे, नाना भांदुर्गे, सुधीर इंगळे, सचिन तनपुरे, शंकर संपत्ते, सागर केकाण, सतीश कुंभार, राहुल तांबे, शरद गोरे, विक्रमल सावंत, तसेच पोलीस मित्र दिनेश परिहार यांनी ही कामगिरी केली.