सरत्या वर्षात ५,२५६ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई, ३१ डिसेंबरलाही ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ विरोधात विशेष मोहीम

पुणे: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या पार्ट्यांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी तयारी सुरू केली आहे. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे. डिस्पोजेबल पाइपसह ब्रेथ ॲनलायझरच्या मदतीने मद्यपान केलेल्या वाहनचालकांवर कारवाई होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. २०२४ या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात वाहतूक शाखेकडून ३० हून अधिक ठिकाणी ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ विरोधात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

कोविडच्या काळात ब्रेथ ॲनलायझरच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे अनेक वाहनचालक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळून आले होते. मात्र, डिसेंबर २०२३ पासून ब्रेथ ॲनलायझरचा वापर पुन्हा सुरू करण्यात आला आहे. १ जानेवारी ते २७ डिसेंबर २०२४ या कालावधीत ५,२५६ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास ई-चलानद्वारे दंड आकारला जातो, पण ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणांमध्ये थेट न्यायालयीन खटला दाखल केला जातो. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात वाहतूक पोलिसांनी १,४३३ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करत सर्वाधिक प्रकरणांची नोंद केली आहे.

वाहनचालकांनी नशा अथवा मद्यपान करून वाहन चालवू नये. शहरात ठिकठिकाणी ड्रंक अँड ड्राइव्हविरोधात कारवाई करण्यात येत आहे. विशेषतः नवीन वर्षाचे स्वागत करताना, सरत्या वर्षाला निरोप देताना आपल्यामुळे दुसऱ्या कुणाचा जीव धोक्यात येणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा अशा वाहनचालकांवर आम्ही कायदेशीर कारवाई करणारच.
– पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, वाहतूक शाखा

Leave a Reply

rushi