अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारने दोन मजुरांना उडवले; एकाचा मृत्यू
अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारने मेट्रोच्या कर्मचाऱ्यांना उडवल्याची घटना घडली आहे. या अपघातात एक मजुर ठार झाला आहे, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. मुंबईतील कांदिवली परिसरात पोईसर मेट्रो स्थानकाजवळ आज (दि. 28) एक भीषण अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, उर्मिला कोठारे शूटिंग संपवून घरी परतत असताना तिच्या कारच्या चालकाचे नियंत्रण सुटले. अधिक वेगामुळे कार रस्त्याच्या कडेला असलेल्या मेट्रो कर्मचाऱ्यांना कारने उडवले. या अपघातात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आणि दुसरा गंभीर जखमी झाला.
अपघातानंतर, उर्मिला आणि तिच्या कारचा चालक देखील जखमी झाले आहेत. कारचा चक्काचूर झाला असून, एअर बॅग योग्य वेळी उघडल्यामुळे उर्मिला कोठारेचा जीव वाचल्याचं सांगितलं जात आहे.
या प्रकरणी मुंबईतील समतानगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पोलिसांनी तपास सुरू केला आहे.