थेऊर येथील गोळीबार प्रकरणी एकूण ०३ जण ताब्यात; गुन्हे शाखा यूनिट ६ ची कामगिरी
किरकोळ वादातून पुण्याच्या लोणी काळभोर भागामध्ये हवेत गोळीबार करण्यात आला आहे. गोळीबार केल्यानंतर आरोपिंनी घटनास्थळावरून थेऊर बाजूकडे पळून जाण्याचा प्रयत्न केला. लघुशंका करताना हटकल्याने मारहाण करत हवेत गोळीबार केला गेला. या मारहाणीमध्ये फिर्यादी अक्षय साहेबराव चव्हाण यांची पत्नी शीतल अक्षय चव्हाण वय ३२ रा थेऊर जय मल्हार प्लॉटिंग जवळ ता हवेली जि पुणे या गंभीर जखमी झाले आहेत. घटना घडल्या नंतर लोणीकाळभोर पोलीसांनी पुढे गुन्हे शाखा यूनिट ६ कडील प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांना संपर्क साधून एक काळे रंगाची फॉर्च्युनर गाडी थेऊर बाजूकडून केसनंद बाजूकडे वेगाने येत असलेबाबत कळविले असता श्री पठाण यांनी तात्काळ आपल्या स्टाफच्या वेगवेगळ्या टीम बनवून लोणीकंद बाजूकडे रवाना केल्या. तसेच पुढे लोणीकंद तपास पथकाशी संपर्क साधुन लोणीकंद येथील थेऊर फाटा येथे सदरची फॉर्च्युनर गाडी युनिट ६ च्या पथकाने व लोणीकंद तपास पथकातील दोन कर्मचाऱ्याच्या मदतीने गाड्या आडव्या लावून अडथळा करून एकूण तीन संशयित इसमांना ताब्यात घेतले आहे. त्याची नावे सतीश बारीकराव लोखंडे वय ३१, अजय दशरथ मुंढे वय २६, भानुदास दत्तात्रय शेलार वय ३२ सर्व रा. चिंबळी फाटा, ता खेड, जि पुणे अशी आहेत. तर गाडीमधील आणखी ०३ इसम अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले असून त्यांचा कसून शोध सुरू आहे. ताब्यात असलेल्या इसमांकडून एक पिस्टल व काही काडतुसे देखील जप्त करण्यात आली आहेत. पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.