वाघोलीत शेतकऱ्याच्या बंगल्यावर गोळीबार, कारण अस्पष्ट
पुणे : वाघोलीतील एक शेतकऱ्याच्या बंगल्यावर बुधवारी पहाटे गोळीबार करण्यात आला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. गोळीबाराच्या कारणाबाबत अद्याप काही स्पष्टता नाही. पोलिसांनी पसार झालेल्या आरोपीचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी दोन पुंगळ्या जप्त केल्या आहेत. खिडकीतून दोन गोळ्या झाडल्याचे स्पष्ट झाले आहे.
निलेश सुभाष सातव (वय ३३, वडजाई वस्ती, डोमखेल-आव्हाळवाडी रस्ता, वाघोली) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात या घटनेची फिर्याद दिली आहे.
सातव हे शेतकरी असून त्यांचा बंगला वडजाई वस्ती परिसरात आहे. बुधवारी पहाटे चारच्या सुमारास त्यांच्या बंगल्याच्या खिडकीवर गोळीबार करण्यात आला. गोळीबारामुळे खिडकीच्या काचा फुटल्या. गाढ झोपेत असलेल्या सातव कुटुंबीयांना गोळीबाराचा आवाज ऐकून जाग आली. त्यांना काच फुटल्याचे आणि घरात दोन पुंगळ्या पडल्याचे लक्षात आले.
सातव यांनी ताबडतोब पोलिसांना सूचित केले. पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी, तसेच परिमंडळ चारचे उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे आणि वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक पंडीत रेजितवाड घटनास्थळी पोहोचले. गोळीबाराची माहिती मिळताच तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जखमी झाली नाही. सातव यांच्या कोणाशीही वाद नाही, त्यामुळे गोळीबाराचे कारण समजू शकलेले नाही. पोलिसांनी हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी सहा पथके रवाना केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक विनायक अहिरे तपास करत आहेत.