विनोद कांबळीची तब्येत बिघडली, ठाण्याच्या रुग्णालयात दाखल
भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी प्रकृती खालावल्याने ठाण्याच्या एका रुग्णालयात दाखल झाला आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सर्व आवश्यक वैद्यकीय चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.शनिवारी रात्री अचानक कांबळीची प्रकृती बिघडल्याने त्याला ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
काही दिवसांपूर्वी विकी लालवानीच्या यूट्यूब चॅनलवरील मुलाखतीत कांबळीने आपल्या तब्येतीच्या समस्या उघड केल्या होत्या. त्याने सांगितले की, त्याला लघवीशी संबंधित समस्या होत्या आणि एकदा चक्कर येऊन तो पडला होता. त्याच्या मुलाने त्याला सावरले, तर पत्नी आणि मुलगी मदतीला धावून आल्या होत्या. त्यावेळी सचिन तेंडुलकरने त्याच्या शस्त्रक्रियेचा खर्च उचलल्याचेही कांबळीने सांगितले.
काही दिवसांपूर्वी दिवंगत रमाकांत आचरेकर सरांच्या स्मृतीचिन्हाच्या अनावरण सोहळ्यात कांबळी सहभागी झाला होता. त्या वेळी त्याची तब्येत पाहून उपस्थित सर्वांनाच दुःख झाले. त्याला नीट बोलताही येत नव्हते, मात्र त्या स्थितीतही त्याने आचरेकर सरांचे आवडते गाणे गायले होते, ज्यामुळे अनेकांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले.
कांबळीच्या प्रकृतीची स्थिती पाहता, १९८३ च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील माजी क्रिकेटपटूंनी त्याला मदत करण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, त्यांनी त्याला रिहॅब सेंटरमध्ये जाण्याची अट घातली आहे. माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी कांबळीला आपल्या मुलासारखे मानले असून, त्याच्या पुनर्वसनासाठी आवश्यक ती मदत करण्याची तयारी दाखवली आहे.