वाघोलीत मद्यधुंद डंपर चालकाने नऊ जणांना चिरडले, दोन चिमुरड्यांसह तिघांचा जागीच मृत्यू
पुणे शहरातील अपघातांचे सत्र थांबता थांबेना. चालकाने मद्यधुंद अवस्थेत डंपर चालवत फुटपाथ वर झोपलेल्या नऊ जणांना चिरडल्याची घटना वाघोली चौक, वाघोली परिसरात घडली आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून. सहा जण गंभीर जखमी आहेत.
२३ डिसेंबरच्या पहाटे एकच्या सुमारास ही घटना घडली. सर्व जखमींना आयनॉक्स रुग्णालयात प्राथमिक उपचार देण्यात आले असून पुढील उपचारासाठी त्यांना ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तसेच तीन मृत व्यक्तींचे मृतदेह देखील ससून मध्ये पाठवण्यात आले आहे.
याप्रकरणी डंपर चालक गजानन शंकर तोट्रे (वय २६, रा. नांदेड) याला ताब्यात घेण्यात आली आहे. वैद्यकीय चाचणीत त्याने दारू पिल्याचे सिद्ध झाले. तोट्रे याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
मिळालेल्या माहितीनुसार, 23 डिसेंबरच्या पहाटे एक वाजण्याच्या सुमारास वाघोली चौक परिसरात वाघोली पोलीस स्टेशनच्या समोर एक भीषण अपघात घडला. डंपर क्रमांक MH 12 VF 0437 या वाहनाच्या चालकाने दारूच्या नशेत वाहनाचा ताबा गमावला. फुटपाथ वर झोपलेल्या नागरिकांना त्याने चिरडले. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
विशाल विनोद पवार (२२, अमरावती) , वैभवी रितेश पवार (वय १) आणि वैभव रितेश पवार (वय २) या तिघांचा या अपघातात जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
तर, जानकी दिनेश पवार (वय २१), रिनिशा विनोद पवार (वय १८), रोशन शशादू भोसले (वय ९), नागेश निवृत्ती पवार (वय २७), दर्शन संजय वैराळ (वय १८), अलिशा विनोद पवार (वय ४७) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर आयनॉक्स रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले असून पुढील उपचारासाठी त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या दुर्दैवी घटनेने वाघोली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.
अपघातात जखमी झालेले सर्व मजूर आहेत. रविवारी रात्री ते अमरावतीहून कामानिमित्त पुण्यात आले होते. फुटपाथ वर एकूण १३ जण झोपले होते. बाकीचे लोक फूटपाथच्या बाजूला झोपडीत झोपले होते. भरधाव डंपरने थेट फूटपाथवर जाऊन झोपलेल्या लोकांना चिरडले.