लिफ्टमध्ये घुसून शिक्षिकेला हातोडीने मारले, जुनी सांगवी येथील भयंकर घटना

लिफ्टमधून जात असताना एकाने एका शिक्षिकेच्या डोक्यात हातोडीने मारून तिला गंभीर जखमी केले तसेच तिच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना जुनी सांगवी येथे घडली.

या शिक्षिकेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, फिर्यादी शिक्षिका खासगी शिकवणी घेतात. विद्यार्थ्यांना घरी जाऊन शिकवण्याचे काम देखील करतात. गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास, शिक्षिका पांलाडे निवास येथील एका कुटुंबातील मुलाला शिकवण्यासाठी जात होत्या. इमारतीच्या पार्किंगच्या लिफ्टमध्ये शिक्षिका आणि त्या विद्यार्थ्याची आई एकत्र दाखल झाल्या. त्यावेळी अचानक आरोपी लिफ्टमध्ये आला आणि शिक्षिकेवर मागून हल्ला केला. त्याने शिक्षिकेच्या डोक्यात, पाठीत आणि खांद्यावर हातोडीने मारून गंभीर जखमी केले. त्यानंतर, शिक्षिकेच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची ६० हजार रुपये किमतीची सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावली आणि घटनास्थळावरून पसार झाला.

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असून, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. त्याआधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्याची मोहिम सुरू केली आहे.

Leave a Reply

rushi