लोहगाव विमानतळाला ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज’ यांचे नाव देण्याचा ठराव विधानसभेत मंजूर

पुणे : लोहगाव विमानतळाला ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज’ यांचे नाव देण्याचा ठराव महाराष्ट्र विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे. हा ठराव पुढील कारवाईसाठी आणि विमानतळाच्या नावात बदल करण्यासाठी केंद्राकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतर विमानतळाचे नाव बदलले जाईल.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे ठेवण्याची मागणी केली होती. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आता विधानसभेने तो मंजूर केला असून, हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला जाणार आहे. केंद्राची मंजूरी मिळाल्यानंतर विमानतळाचे नवे नाव भारताच्या राजपत्रात अधिकृतपणे अधिसूचित केले जाईल.

विधानसभेच्या अधिवेशनाच्या दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या नियम ११० अन्वये हा ठराव मांडला, आणि तो मंजूर झाला. पुणे विमानतळाच्या नामांतराचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाने यापूर्वीच मंजूर केला होता.

या निर्णयाबद्दल माहिती देताना, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त केले.

संत तुकाराम हे महाराष्ट्रातील महान संत आणि आध्यात्मिक कवी होते, ज्यांचा जन्म पुणे जिल्ह्यात झाला. लोहगाव हे संत तुकाराम यांचे आजोळ होते.

राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एक्सवर पोस्ट करत ‘जगद़्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे’ या नावासाठीचा पुनर्नामकरण प्रस्ताव महाराष्ट्र विधीमंडळात मंजूर करण्यात आल्याची माहिती दिली आहे. मोहोळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले .

Leave a Reply

rushi