पब संस्कृतीला विरोध नाही, परंतु निर्बंध आवश्यक; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे वक्तव्य
पुणे: पुण्यातील पब संस्कृतीला पोलिसांचा विरोध नाही, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले. तथापि, नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. त्यासाठी पबवर निर्बंध लावणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. ते ‘कॉफी विथ सीपी’ या वार्तालाप कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन पोलिस आरोग्य मित्र फाउंडेशन आणि सुभाषनगर माडीवाले वसाहत गणेशोत्सव मंडळाने केले होते.
आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, पब चालकांनी नियमांचे पालन केले नाही, तर आम्ही फक्त कारवाईच करणार नाही, तर त्यांना असा आर्थिक दंड ठोकला जाईल ज्यामुळे त्यांना आयुष्यभरचा धडा मिळेल.
पोर्शे अपघाताच्या प्रकरणानंतर पालकांना एक महत्त्वाचा धडा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. मुले आता घरी गाडी मागण्यासही धजावत नाहीत. कारण त्यांना माहित आहे की एका मुलाने दोघांचा जीव घेतला आणि त्याचे आईवडील आज जेलमध्ये आहेत.
त्यांनी पुण्याच्या सांस्कृतिक वारशावर देखील विचार मांडले. पुण्यासारख्या शहरात काम करण्याचा अनुभव अत्यंत आनंददायक आहे. विविध ठिकाणी २८ वर्षे काम केले. पण खरा गणपती उत्सव पुण्यातच अनुभवला, असे ते म्हणाले. पुण्यातील ड्रग रॅकेट्सवर करण्यात आलेल्या कार्यवाहीबद्दल बोलताना ते म्हणाले, ड्रग्समुक्त पुणे करण्याचा निर्धार ठेवून काम सुरू केले आणि ३६०० कोटींच्या ड्रग रॅकेटचा पर्दाफाश केला.
बोपदेव येथील बलात्काराच्या घटनेनंतर शहरातील २२ टेकड्यांवर सुरक्षेसाठी काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
पोलीस आयुक्तांनी सायबर गुन्हे रोखण्यासाठी पुण्यात सुसज्ज प्रयोगशाळा स्थापनेसाठी पाठपुरावा सुरू असल्याचेही सांगितले. तसेच, पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा आणि महिलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी काही महत्त्वाच्या उपाययोजना घेतल्याचे सांगितले.