चादरीत गुंडाळलेल्या ‘त्या’ मृतदेहाचे रहस्य उलगडले अन् पोलिसांसह सर्वांनीच लावला डोक्याला हात
पिंपरी : चादरीमध्ये गुंडाळलेला एक मृतदेह मोकळ्या मैदानात पडलेला असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबद्दल कळवले. गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चादर उलगडून त्यात गुंडाळलेला तो मृतदेह बाहेर काढला. मात्र त्या मृतदेहाकडे बघून पोलिसांनी डोक्यालाच हात लावून घेतला. चादरीत गुंडाळलेला तो मृतदेह कोणत्याही मनुष्याचा नव्हताच. तो मृतदेह एका श्वानाचा होता. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास शिंदे वस्ती येथे चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत एक मृतदेह असल्याची माहिती मिळाली. हा नक्की खुनाचा प्रकार असल्याची खात्री पोलिसांना वाटत होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेची पथकेही घटनास्थळी दाखल झाली. चादरीत गुंडाळलेल्या ‘त्या’ मृतदेहाचे फोटो काढण्यात आले.
थोडी दुर्गंधीही येत होती. त्यानंतर पुढील पंचनामा करण्यासाठी चादर उलगडण्यात आली. त्यावेळी चादरीमध्ये मनुष्याचा नव्हे तर कुत्र्याचा मृतदेह आढळून आला. यामुळे उपस्थित असलेल्या सर्वांनी डोक्याला हात लावला.