विमा कंपनीतील व्यवस्थापकाची गुंतवणुकीच्या आमिषाने एक कोटी १९ लाखांची फसवणूक

पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने खासगी विमा कंपनीतील एका व्यवस्थापकाची एक कोटी १९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शिवाजी गजानन शिंदे (वय ३९, रा. डीएसके विद्यानगर, पाषाण-सूस रस्ता), मधुरा रोहन नंदुर्गी (वय ३५, रा. वाकड) आणि रवींद्र नायडू (वय ३७) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

या प्रकरणी फसवणूक झालेल्या विमा कंपनीतील व्यवस्थापकाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शिंदे आणि तक्रारदार व्यवस्थापक यांची ओळख होती आणि दोघांचे मूळगाव एकच आहे. शिंदे बाणेर भागात क्रिप्सिका ॲकडमिक सर्व्हिसेस नावाची शैक्षणिक कंपनी चालवतो, असे त्याने तक्रारदाराला सांगितले होते. २०२१ मध्ये शिंदे याने तक्रारदार व्यवस्थापकाला कंपनीच्या कार्यालयात बोलावून घेतले. त्याचे सहकारी नंदुर्गी आणि नायडू तिथे उपस्थित होते. शिंदे याने त्यांना गुंतवणूक योजनांची माहिती दिली आणि चांगला परतावा मिळवण्याचे आमिष दाखवले.

त्यानंतर, तक्रारदार व्यवस्थापकाने स्वत: आणि नातेवाईकांकडून पैसे गोळा करून शिंदे याला गुंतवणुकीस दिले. सुरुवातीला, शिंदेने काही परतावा दिला. परंतु नंतर तो देणे बंद केले. तक्रारदाराने त्याच्याशी संपर्क साधला असता, शिंदेने कंपनीचे संचालकपद देण्याची आश्वासन दिली. काही दिवसांनी शिंदेने कंपनीचे कार्यालय बंद केले. तक्रारदार यांनी पैसे मागितल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. शिंदेने त्याला राजकीय नेत्यांसोबत आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबत ओळख असल्याचे सांगितले. सतत पैसे मागितल्यास खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची आणि आत्महत्या करण्याची धमकी दिली, असे तक्रारदाराने फिर्यादीत म्हटले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Leave a Reply

rushi