कोथरुडमधील सराईताकडून लाखोंचा गांजा जप्त

पुणे : खुनाचा प्रयत्न आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या एका गुंडाला अमली पदार्थ विरोधी पथकाने लोणी काळभोरमधून अटक केली. त्याच्याकडून तीन लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे.

अटक केलेल्या गुंडाचे नाव साहिल विनायक जगताप (वय २८, रा. केळेवाडी, कोथरूड) आहे. दोन वर्षांपूर्वी साहिल आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली होती. तो नुकताच कारागृहातून सुटला होता. त्याने अमली पदार्थांची विक्री सुरू केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली.

जगताप अमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी लोणी काळभोर येथील टोलनाक्याजवळ सापळा लावला आणि त्याला अटक केली. त्याच्या पिशवीत तीन लाख रुपये किमतीचा गांजा सापडला. त्याने हा गांजा कुठून आणला आणि तो कोणाला विकणार होता, याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे आणि सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली, अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक शशिकांत खोसे, मारुती पारधी, प्रवीण उत्तेकर आणि इतर पोलिसांनी ही कारवाई केली.

Leave a Reply

rushi