वाघोलीतील आर्यन बार अँड रेस्टॉरंटमध्ये मालकाने केला गोळीबार

वाघोली पोलीस स्टेशन हद्दीतील बकोरी गाव रस्त्यावरील आर्यन बार अँड रेस्टॉरंट येथे बार मालकाने गोळीबार केल्याची घटना घडली. बारमध्ये आलेला ग्राहक आणि व्यसनमुक्ती केंद्रातील कर्मचारी यांच्यात झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे

याप्रकरणी आरोपी बारमालक विशाल उर्फ दादा रामदास कोलते (रा. बकोरी, पुणे) याला वाघोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली पोलीस स्टेशन हद्दीतील बकोरी गाव रोडवरील आर्यन बार अँड रेस्टॉरंट येथे संदीप कैलास हरगुडे (वय ४०, रा. केसनंद) हे दारू प्यायला बसले होते. तेव्हा त्यांची पत्नी श्रद्धा संदीप हरगुडे यांनी व्यसनाच्या आहारी गेलेल्या पतीस व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्यासाठी मदतीची मागणी केली. त्यावर व्यसनमुक्ती केंद्राचे कर्मचारी ॲम्बुलन्सद्वारे घटनास्थळी आले होते.

यावेळी संदीप हरगुडे आणि व्यसनमुक्ती केंद्रातील कर्मचार्‍यांमध्ये वादविवाद झाला. या वादामुळे बारचा मालक विशाल उर्फ दादा रामदास कोलते (रा. बकोरी, पुणे) यांनी त्याच्याकडे असलेल्या परवानाधारक बंदुकीतून एक राउंड जमिनीवर फायर केला. या प्रकारात कोणतीही जखमी झाले नाही. तथापि, ॲम्ब्युलन्सच्या काचा फोडून नुकसान करण्यात आले.

या घटनेनंतर ॲम्ब्युलन्स जाळण्याचा प्रयत्न झाला असल्याबाबत कॉल प्राप्त झाला होता. पण त्याप्रमाणे काहीही घडले नाही. सध्या आरोपी विशाल कोलते वाघोली पोलीस स्टेशनच्या ताब्यात आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

संदीप हरगुडे (रा. केसनंद गाव, तालुका हवेली जिल्हा पुणे) आणि (विशाल कोलते रा. बकोरी गाव, तालुका हवेली, जिल्हा पुणे) हे दोघे विशाल कोलते याच्या आर्यन परमिट बार, बकोरी येथे दारू पित असताना त्यांच्यामध्ये कोणत्या तरी कारणावरून वाद होऊन रागात विशाल कोलते याने स्वतः जवळील पिस्टल मधून जमिनीवर फायर केला आहे. कोणतीही जीवित हानी नाही. विशाल कोलते हा सध्या वाघोली पोलिसांचे ताब्यात आहे. परिस्थिती शांत आहे.

-रामकृष्ण दळवी, पोलीस उपनिरीक्षक, युनिट ०६, गुन्हे शाखा, पुणे शहर

आज आर्यन बार, बकोरी समोर सायंकाळी ९ च्या सुमारास संदीप कैलास हरगुडे यांना जागृती व्यसनमुक्ती केंद्राची गाडी घेऊन जाण्यासाठी आली असता त्यांना विरोध करण्यासाठी संदीप याचा मित्र नामे विशाल रामदास कोलते यांनी त्याचेकडे असलेल्या परवानाधारक रिवाल्वरने जमिनीच्या दिशेने एक राउंड फायर केलेला आहे. आरोपी व अग्नीशस्त्र ताब्यात घेतले आहे. कायदा व सुव्यवस्थेचा काही एक प्रश्न नाही. परीसरात शांतता आहे. पुढील कार्यवाही करीत आहोत. कोणीही जखमी नाही. आरोपीचा पूर्व गुन्हे अभिलेख निरंक आहे.

-पंडीत रेजितवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाघोली पोलीस स्टेशन

Leave a Reply

rushi