सतीश वाघ हत्या प्रकरणातील आरोपींना २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

पुणे : हडपसर पोलिसांनी हॉटेल व्यावसायिक सतीश सादबा वाघ यांचा सुपारी देऊन खून केल्याप्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. वानवडी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आरोपींना २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सतीश वाघ यांचा भाडेकरू असलेल्या अक्षय जवळकरने पाच लाख रुपयांची सुपारी देऊन खून घडवला असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

पवन श्यामसुंदर शर्मा (वय ३०, रा. लक्ष्मी हाईट्स, काळुबाई नगर, आव्हाळवाडी), नवनाथ अर्जुन गुरसाळे (वय ३१, रा. गणेश नगर, डोमखेल रस्ता, वाघोली, मूळ रा. बीड), विकास ऊर्फ विक्की सीताराम शिंदे (वय २८, रा. बजरंग नगर, वाघोली, मूळ रा. अहिल्यानगर, अक्षय ऊर्फ सोन्या हरीश जवळकर (वय २९, रा. फुरसुंगी फाटा, विघ्नहर्ता सोसायटी) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी सतीश वाघ यांचा मुलगा ओंकार वाघ यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

सतीश वाघ हे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा होते. आरोपी अक्षय जवळकर हा सतीश वाघ यांच्याकडे भाडेकरू म्हणून राहत होता. पण त्यांच्यात वाद झाल्यामुळे अक्षयने खोली सोडली होती. या वादाच्या कारणावरून अक्षयने चार-पाच महिन्यांपूर्वी आरोपी पवनला पाच लाख रुपये सुपारी देऊन वाघ यांचा खून करण्याची योजना तयार केली.

९ डिसेंबर रोजी सतीश वाघ सकाळी सहा वाजता फिरायला गेले होते. आरोपींनी त्यांचे मोटारीतून अपहरण केले आणि त्यांना सासवडच्या दिशेने नेले. तिथे चाकूने त्यांचा खून करून मृतदे शिंदवणे घाटामध्ये फेकून दिला होता.

Leave a Reply

rushi