अकोले पोलिसांची असंवेदनशीलता: एकाच कुटुंबातील चौघांना चिरडले, ‘हिट अँण्ड रन’ मधील आरोपी अद्यापही मोकाट

अकोले येथे मतदान करून घरी निघालेल्या एकाच कुटुंबातील चौघांना एका पिकअप वाहनाने चिरडले. ‘हिट अँड रन’चा हा भयानक प्रकार २० नोव्हेंबरला अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील देवठाण या गावाजवळ घडला. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. परंतु आकोले पोलिसांनी मात्र हे प्रकरण हाताळताना अतिशय असंवेदनशीलता दाखवली. पोलिसांनी अद्यापही आरोपीस अटक केलेली नसून गुन्हा दाखल करताना चुकीची कलमे लावण्यात आली, असा आरोप म्रुतांच्या नातेवाईकांनी केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, 20 नोव्हेंबर 2024 या दिवशी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभर मतदान होणार होते. आपले मतदानाचे कर्तव्य बजवण्यासाठी एका सामान्य कुटुंबातील चौघे सिन्नरहून अकोले येथे आले. मतदान करून ते परत सिन्नरकडे मोटरसायकलवरून निघाले असताना देवठाण या गावाजवळ असलेल्या गायकवाड वस्तीजवळ रस्त्याच्या बाजूला चौघे थांबले होते. यावेळेस सिन्नरकडून येणाऱ्या एका बिगरलाइटच्या पिकअप वाहनाने (MH17 CV 1497 ) मोटरसायकलला धडक दिली. त्यानंतर पिकअप चालक आपल्या वाहनासह तिथून पळून गेला. या घटनेत गणेश भिकाजी झोळेकर (वय 35), सर्वेश संतोष झोळेकर (वय 20), अनिकेत सुभाष लगड (वय 20) यांचा उपचाराआधीच मृत्यू झाला. उपचाराकरिता संगमनेर येथे नेण्यात आलेल्या जखमी ज्योती संतोष झोळेकर (वय 35) यांचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या प्रकरणी अमेय एकनाथ झळेकर (रा. धुमाळवाडी ता. अकोले) यांनी अकोले पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार अज्ञात पिकअप चालका विरोधात गु.र.नं -614/2024 भा.न्या.सं कलम-106(1),281,125(a),125(b) सह मो. वा. का कलम 184,134/177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी वाहनचालक विकास भाऊसाहेब पाडेकर (रा. बहिरवाडी, मु. मेहंदरी, पो. रुंभोडी, ता. अकोले) असल्याचे निष्पन्न झाले. मात्र अद्याप पोलिसांनी आरोपीला अटक केलेली नाही. तरी पोलीस आरोपीला अटक कधी करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

तसेच, या घटनेला २० दिवस उलटून गेले तरी पोलिसांनी हे प्रकरण नीट हाताळले नसल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी ‘द स्कूप’शी बोलताना केला आहे. या घटनेतील पिकअपचालक आरोपी विकास भाऊसाहेब पाडेकर (रा. बहिरवाडी, मु. मेहंदरी, पोस्ट रुंभोडी, ता. अकोले) असल्याचे निष्पन्न झाले. मात्र पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

‘द स्कूप’शी बोलताना मृतांचे नातेवाईक म्हणाले की, पोलिसांनी आरोपीचे मेडिकल देखील केले नाही. तसेच गुन्हा देखील व्यवस्थित नोंदवून घेतला नाही. पोलिसांनी पैसे घेऊन ‘मॅटर सेटल केला’ असा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच पोलिसांनी आरोपीला अटक केली नाही. आरोपीला साधं पोलिस स्टेशनला सुद्धा बोलावलं नाही. ज्या लोकांचा मृत्यू झाला ते खूप गरीब घरातील आहे. जेव्हा पिकअपने त्यांना धडक दिली तेव्हा ते रस्त्याच्या कडेला उभे होते. मृतांच्या अंत्यविधीसाठी सुद्धा त्यांच्या कुटुंबियांकडे पैसे नव्हते. नातेवाइकांनी मृतांच्या कुटुंबियांना थोडे पैसे दिले. तसेच या प्रकरणात तुम्ही केस केली तर तुम्हाला इशुरन्स व क्लेमचे पैसे आम्ही देणार नाही. तसेच क्लेमचे तुम्हाला आम्ही 15 लाख प्रत्येकी देऊ असे आश्वासन दिल्याचे नातेवाइकांनी सांगितले.

मृत व्यक्ती हे गरिब कुटुबांतील असल्याने अकोले पोलिस स्टेशनला अज्ञात अपघाताची नोंद करून केस बंद करण्यात आली. हा अपघात हिट अँड रन नुसार झाल्याने घटनेतील पिकअप हा बहिरवाडी येथील एका प्रतिष्ठित व्यक्तीचा आहे. पोलिसाकडून याबाबत उडवा – उडवीचे उत्तरे मिळत आहेत. पोलिसांची भूमिका ही संशयास्पद वाटत असून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. या कुटुबांला योग्य तो न्याय मिळावा ही मागणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने विजयराव वाकचौरे यांनी केली आहे . तर याबाबात गृहमंत्र्यांना पत्र देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

rushi