बारामती-भिगवण रस्त्यावर कारचा भीषण अपघात, दोन शिकाऊ पायलट्स जागीच ठार
पुणे: बारामती-भिगवण रस्त्यावर सोमवारी पहाटे कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन शिकाऊ पायलट जागीच ठार झाले असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने भिगवण येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
तक्षू शर्मा (२१, रा. दिल्ली) आणि आदित्य कणसे (२१, रा. मुंबई) असे या अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर कृष्णा इशू सिंह (२१, बिहार) हा कार चालवत होता. तो जखमी असून त्याची प्रकृती स्थिर आहे. तर चेष्टा बिश्नोई (२१, मुळची राजस्थान) ही गंभीर जखमी झाली असून बेशुद्ध असल्याची माहिती मिळाली आहे.
भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामतीकडून भिगवणकडे जात असलेल्या चार जणांच्या कारचा लामजेवाडी गावाजवळ पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. ही मुले रेड बर्ड कॉलेजचे विद्यार्थी होते. रात्री उशिरा गाडी चालवत असताना मद्यपान त्यांनी केले होते. पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे आणि घटनेची पुढील चौकशी सुरू केली आहे.
मात्र हा अपघात कसं घडला याबद्दल अद्याप माहिती मिळाली नाही. मात्र कारच्या स्थितीवरून हा अत्यंत भीषण अपघात झाल्याचे दिसत आहे.