पुणे रेल्वे स्थानकाला बॉम्बने उडवण्याची धमकी, एकजण अटकेत
पुणे: पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवण्याची धमकी रविवारी सकाळी मिळाली. त्यामुळे एकच खळबळ माजली. धमकी देणारा व्यक्तीने दारूच्या नशेत फोन केला असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली आहे.
सागर भंडारी असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून तो किवळे येथील रहिवासी आहे. रावेत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर बॉम्ब ठेवला असल्याची धमकी मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने तपास सुरू केला आणि घटनेची गंभीरता लक्षात घेऊन आवश्यक पावले उचलली. तपासादरम्यान धमकीचा फोन रावेत परिसरातून आल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यांनी या व्यक्तीचा शोध घेऊन त्याला अटक केली. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दारूच्या नशेत फोन केल्याचे भंडारीने पोलिसांना सांगितले. लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्याने हा प्रकार केल्याचे त्याने कबूल केले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.