सिंहगड टेक्निकल इन्स्टिटयूटने थकवला तब्बल ४७ कोटीहून अधिक मिळकत कर; पुणे महापालिकेकडून जप्तीची कारवाई
पुणे : महापालिकेच्या कर संकलन आणि कर आकारणी विभागाने थकबाकीदारांवर कारवाई बडगा उगारला असून बड्या थकबाकीदारांच्या दारात थेट बॅंड बाजा वाजविला जात आहे. त्याचा सकारात्मक परिणाम पहायला मिळत असून कोट्यवधी रुपयांच्या कराची वसूली होऊ लागली आहे. मिळकत कर न भरणाऱ्या मालमत्ता जप्त केल्या जात आहेत. मिळकत विभागाच्या पथकाने अशाच पद्धतीने एरंडवणे येथील सिंहगड टेक्निकल इंस्टिट्यूटची मिळकत जप्त केली आहे. या इंस्टिट्यूटकडे ४७ कोटी ४३ लाख १८ हजार ३०३ रुपयांचा मिळकत कर थकीत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
महापालिकेच्या कर संकलन आणि कर आकारणी विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी सांगितले की, सिंहगड टेक्निकल इन्स्टिटयूटच्या कोंढवा बुद्रुक, आंबेगाव बुद्रुक, एरंडवणे येथे मिळकती आहेत. एरंडवणे येथील मालमत्तेच्या मिळकत कराची थकबाकी ४७ कोटी ४३ लाख १८ हजार ३०३ रुपयांवर पोचली होती. त्यामुळे या मिळकतीवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. बुधवारी ही कारवाई करण्यात आली.
कर आकारणी व कर संकलन विभागाने २०२४-२५ या वर्षासाठी ठरवून घेतलेले कर वसुलीचे उद्दिष्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कारवाईचा धडाका लावला आहे. त्याकरिता २ डिसेंबरपासून कर वसूलीकरिता बॅंड पथकाचा समावेश करण्यात आला आहे. तसेच स्वतंत्र वसूली पथके नेमण्यात आली आहेत. या सर्व पथकांमार्फत १५ क्षेत्रिय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील थकबाकी असलेल्या मिळकतींवर वसुलीची कारवाई हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार, मागील पाच दिवसांत बँड पथकाद्वारे तसेच मध्यवर्ती पथकांद्वारे १६५ मिळकतींवर प्रत्यक्ष धडक मारण्यात आली. या ठिकाणाहून १४ कोटी १४ लाख २६ हजार २१२ रुपयांचा थकीत मिळकत कर वसूल करण्यात आला आहे.
महानगरपालिका कार्यक्षेत्रात १४ लाख ८० हजार मिळकती आहेत. त्यापैकी सुमारे ८ लाख ७४ हजार ५४६ मिळकत धारकांनी त्यांचा १ हजार ८०४ कोटी रुपयांचा मिळकत कर जमा केला आहे. उर्वरीत मिळकत कर थकबाकी धारकांकडे या पुढील कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात थकबाकी वसुलीची कारवाई पथकांमार्फत केली जाणार आहे. ज्या मिळकत धारकांनी अद्यापही कर भरणा केलेला नाही, त्यांनी तात्काळ कर भरावा आणि कारवाई टाळावी असे आवाहन उपायुक्त माधव जगताप यांनी केले आहे.