राष्ट्रवादी गटात प्रवेश केल्यामुळे हल्ला झाल्याचा टिंगरे कुटुंबीयांचा आरोप; दोघे अटकेत

पुणे : विश्रांतवाडी परिसरात माजी नगरसेवक चंद्रकांत टिंगरे यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. टिंगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) पक्षात प्रवेश केल्यामुळे हा हल्ला झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे रेवण तानाजी लगस (वय २०, रा. गोकुळ नगर, कात्रज) आणि प्राणजीत अच्युत शिंदे (वय २४, रा. हांडेवाडी) अशी आहेत. चंद्रकांत टिंगरे यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.

रेखा आणि चंद्रकांत टिंगरे यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षात प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीला त्यांनी महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांना पाठिंबा दिला होता. मात्र, प्रचारादरम्यान पक्षांतर करून बापूसाहेब पठारे यांना पाठिंबा जाहीर केला होता.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी चौकशीदरम्यान हल्ल्याचे कारण सांगताना, चंद्रकांत टिंगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सोडून शरद पवार गटात प्रवेश केल्याने नाराजी व्यक्त करून दगडफेक केल्याचे कबूल केले आहे.

१९ नोव्हेंबर रोजी चंद्रकांत टिंगरे आणि त्यांचे चालक धानोरी येथील महावितरण कार्यालयाबाहेर गाडीत बसले असताना दोन जणांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली आणि त्यांच्यावर हल्ला केला. रेखा टिंगरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या सांगण्यावरून हा हल्ला झाल्याचा आरोप त्यांनी केला होता.

Leave a Reply

rushi