पवनानगर बोट दुर्घटना : बंगला मालक तसेच बोट मालकांवर गुन्हा दाखल
मावळ तालुक्यातील पवना धरणामध्ये बुधवारी सायंकाळी बोट उलटून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी बंगला मालक आणि बोट मालकाविरोधात निष्काळजीपणाचा आरोप ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात मयत तुषार अहिरे यांच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी सांगितले.
मूळचे भुसावळचे रहिवासी तुषार अहिरे आणि मयूर भारसाके हे ४ डिसेंबर रोजी मित्रांसोबत पवना धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. लेक इस्केप व्हिला या बंगल्यात त्यांनी थांबा घेतला होता. हा बंगला पवना जलाशयाच्या बॅकवॉटरला लागून आहे. बंगल्याशेजारी थेट धरणाकडे उतरण्याचा रस्ता आहे.
जलाशयामध्ये सुमती व्हिवा नावाची एक बोट ठेवण्यात आली होती. तुषार, मयूर आणि त्यांचा एक मित्र या बोटीने पाण्यात गेले. मात्र, बोट अचानक उलटली आणि तुषार व मयूर पाण्यात पडले. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला.
या घटनेनंतर नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. बोट मालक व बंगला मालकावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.