पुमा कंपनीचा लोगो वापरून बनावट मालाची विक्री करणाऱ्या दुकानावर छापा, ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पुमा या जगप्रसिद्ध कंपनीचा लोगो वापरून बनावट बॅग, टी-शर्ट, स्पोर्ट्स शूज, स्लायडर चप्पल, जॅकेट, ट्रॉव्हझर, बॉक्सर पॅन्ट विक्री करणाऱ्या दुकानावर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट २ ने छापा टाकत कारवाई केली. या कारवाईत तब्बल ८ लाख रूपयांचा बनावट माल जप्त केला आहे.

शॉपच्या मालकावर आंबेगाव पोलिस ठाण्यात कॉपीराईट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे शहरात विविध ठिकाणी ब्रँडेड कंपन्यांचा बनावट माल विकला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट २ चे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी पथकातील अधिकारी आणि अंमलदारांसह पुमा कंपनीच्या प्रतिनिधी मार्फत शहरात शोध मोहीम सुरू केली होती. कात्रज परिसरातील आंबेगाव बुद्रुक लिपाणे वस्ती येथील ‘स्टाइलॉक्स फॅशन हब’ (stylox fashion hub) या शॉप मध्ये मोठ्या प्रमाणात पुमा कंपनीचे लोगो वापरून बनावट बॅग, टी-शर्ट, स्पोर्ट्स शूज, स्लायडर चप्पल, जॅकेट, ट्रॉव्हझर, बॉक्सर पॅन्टची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या दुकानावर छापा टाकला. त्याठिकाणी पुमा कंपनीचा लोगो वापरून बनावट मालाची विक्री होत असल्याचे आढळून आले. दरम्यान, या ठिकाणाहून पोलिसांनी ८ लाख २ हजार ६०० रुपयांचा बनावट माल जप्त केला आहे.

ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक नितीन कांबळे, पोलीस अंमलदार शंकर नेवसे, अमोल सरडे, ओमकार कुंभार, संजय आबनावे, विनोद चव्हाण, साधना ताम्हाणे, विजय पवार, प्रमोद कोकणे, निखिल जाधव, गणेश थोरात, नागनाथ राख यांनी केली.

Leave a Reply

rushi